fbpx

रामदास आठवले यांनी दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अंतिम टप्यात आले असता उत्तर भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर भाजप आणि भाजप विरोधी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यातच आता केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांना सडकून टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करण्यापेक्षा मायावतींनी स्वत: लग्न करावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी मयावतींना दिला आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी मायावती यांनी प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून वक्तव्य केलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर देत रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी मायावती यांना टोला लगावला आहे. यावेळी आठवले म्हणाले की, मायावती या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करीत आहेत. मात्र मायावती यांचा विवाह झाला नसल्याने त्यांना घर संसाराबाबत काहीही माहीत नाहीये. जर मायावतींचा विवाह झाला असता तर त्यांना समजलं असतं पतीला कशाप्रकारे हाताळले जाते. आम्ही मायावतींचा सन्मान करतो पण त्यांनी अशी वक्तव्य करायला नको होती. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदावर बसतील, असा विश्वास आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना धुळीत मिळवण्यासाठी भाजप विरोधकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तसेच प्रचारच्या रणधुमाळीत विरोधकांकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना राजकीय मुद्यांच्या आधारे चांगलेच धारेवर धरले जात आहे. मात्र काही पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्या जाता आहेत.