fbpx

Karnataka Election : मायावतींचा एक फोन आणि भाजपच्या स्वप्नांना सुरुंग !

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देण्याची तयारी दाखवून कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. मात्र, काँग्रेसच्या या खेळीमागे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती असल्याचे सांगितले जाते. मायावती यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावत निकालाचे चित्र स्पष्ट होताच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना फोन केला होता. आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा सल्ला त्यांनीच सोनिया गांधी आणि जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांना दिला होता, असे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मायावती यांनी जवळचे सहकारी आणि राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ यांना निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आझाद यांनी जेडीएसशी आघाडी करण्यासंदर्भात सोनियांशी चर्चा केल्यानंतर मायावती यांनी देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि काँग्रेसशी आघाडी करण्याची विनंती केली. तसंच सोनियांनाही फोन करून जेडीएसला बाहेरून पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. तो सोनियांनी मान्य केला.