भाजपाला शह देण्यासाठी मायावती सक्रिय, ‘बसपा’ अयोध्येत ब्राह्मण संमेलन भरवणार

लखनऊ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतीही सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीचे निर्देश दिलेत. त्याशिवाय त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मास्टरप्लॅनही तयार केलेत.

त्याचाच एक भाग म्हणून बसपा ब्राह्मणांचे मंडलीय संमेल्लन आयोजित करणार आहे. याची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे. याची सुरुवात २३ जुलैपासून अयोद्धेतून होणार आहे. मिशन २०२२ साठी ब्राह्मणांना सोबत जोडण्यासाठी मायावती रणनीती आखताना दिसत आहेत.

याबाबत मायावती यांनी सांगितले की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपाला मतदान करणार नाही. अयोध्येतून ब्राह्मण समाजाला जोडण्यासाठी व त्यांचे हीत बसपा सरकारमध्येच आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे. त्याकरिता अयोध्येत ब्राह्मण संमलेन घेतले जाणार आहे.

बसपा स्वतंत्र लढणार
बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी १५ जानेवारी, २०२१ रोजी एक महत्त्वाची घोषणा केली होती. आगामी निवडणुकीत बसपा कुणाशीही आघाडी करणार नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचं मायावतींनी जाहीर केले. कोणत्याही पक्षाशी आघाडी केल्यानं त्याचं नुकसान बहुजन समाज पक्षालाच सहन करावं लागतं, असंही मायावतींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या