fbpx

मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही, राहुल गांधींना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या शेवटच्या टप्यातील मतदान रविवारी होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी प्रचारच्या तोफा थंडावल्या आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या टप्यातील मतदानाकडे लागले आहे. तर दुसरीकडे भाजप विरोधी पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु केली आहे.

अशातच मायावती आणि अखिलेश यादव भाजपला पाठींबा देतील अशी चर्चा आहे परंतु कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील विविध पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईलअसं विधान केले आहे.

तसेच मायावती आणि अखिलेश यादव भाजपसोबत जातील, असं वाटत नाही असं राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर राहुल यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अशा स्थितीचा प्रचंड अनुभव असल्याचे म्हटले. पुढे बोलताना त्यांनी अनुभवी लोकांना दूर करण्यासाठी मी काय नरेंद्र मोदी नाही असा टोलाही मोदींना लगावला.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे विरोधकांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचे अस्त्र अवलंबले आहे. त्यासठी चंद्राबाबू नायडू आणि के. चंद्रशेखर राव विविध पक्षनेत्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत.