दिलीप कांबळेंंना मंत्रीपदावरून हटविल्याने राज्यातील मातंग समाजात नाराजी

dilip-kamble

मुंबई – बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. या विस्ताराबरोबर बऱ्याच निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देण्यात आला यामध्ये सामाजिक न्याय विभाग ज्यांच्याकडे होता त्या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना देखील डच्चू देण्यात आला. मात्र आता कांबळे यांना मंत्रीपदावरून हटविल्याने राज्यातील मातंग समाजात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कोकणचा काही अपवाद सोडल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मांग, मातंग समाज आहे. या समाजाला राज्यमंत्रिमंडळामध्ये केवळ दिलीप कांबळे यांच्यामुळे प्रतिनिधित्व मिळाले होते. मात्र, सरकारने आज त्यांनाही वगळल्याने राज्यात आमचा ८ टक्केहून अधिक समाज आहे. या समाजाला भाजपने किमान दोन मंत्रीपदे देणे आवश्यक होते. असे असताना मागील साडेचार वर्षात केवळ एकच राज्यमंत्रीपद दिले. तर आता तेही वगळले असल्याने या समाजाचे प्रतिनिधित्व कोण करणार? असा सवाल मातंग समाज एकता दलाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, काल प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांचा समावेश आहे. या मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारले देखील आहेत.