सामूहिक धर्मांतराची घटना धोकादायक; सामाजिक अन्यायामुळे उद्भवली ही परिस्थिती – भाजप खासदार

Una-Dalit-

अहमदाबाद: स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केलेल्या उना प्रकरणातील दलितांनी सामुहिक हिंदू धर्माचा त्याग केला. सामूहिक धर्मांतराची घटना ही धोकादायक परिस्थितीचे द्योतक असल्याचा इशारा भाजपाचे गुजरातमधील खासदार उदित राज यांनी दिला. सामाजिक अन्यायामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. साधी मिशी ठेवली तरी दलितांना मारहाण केली जाते. हे सर्व रोखण्यासाठी नेमके काय करावे, हे मला माहिती नाही. परंतु, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, असे भाजप खासदार उदित राज यांनी म्हटले आहे.

गुजरातच्या उना येथे गोरक्षक पीडित दलितांच्या एका समुहाने रविवारी हिंदू धर्माचा त्याग केला. यांना २०१६ मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आली होती. उना दलित अत्याचार प्रकरणातील एका कुटुंबासोबत जवळपास ३०० ते ३५० दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळणार आहे.

मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.

दरम्यान, पीडित कुटुंबाने आणि इतर दलितांनी धर्मांतरादरम्यान शपथ घेतली की, ते केवळ बौद्ध धर्माला मानतील आणि हिंदू देवी-देवतांवर विश्वास ठेवणार नाही. हा दुसरा जन्म असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. याशिवाय, ‘आम्हाला हिंदूच मानले जात नव्हते, मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता. याच कारणामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.