मारवाडी समाज गरिबांची पिळवणूक करणारा समाज म्हणून ओळखला जायचा : शिंदे

नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मारवाडी समाज हा पिळवणूक करणारा समाज असल्याचे वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे.विशेष म्हणजे मारवाडी फाऊंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यातच ही मुक्ताफळे शिंदे यांनी उधळली आहेत.

यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देण्यात आला. मारवाडी समाज एक लोटा आणि एक पंचा घेऊन मारवाड मधून आला. मात्र मेहनत व नशिबाच्या जोरावर त्यांनी पैसा कमावला आणि आज तोच मारवाडी समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देत असल्याचं शिंदे यांनी कौतुक देखील केलं. मात्र मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज म्हणून ओळखला जायचा असं विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.