fbpx

वीरपत्नी बनली उपशिक्षणाधिकारी !

गडचिरोली : नक्षली चकमकीत हौतात्म्य पत्करलेल्या शहीद पोलिस जुरू परसा यांच्या पत्नीने समाजापुढे एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. वीरपत्नी हेमलता परसा यांनी पतीच्या निधनाचे दुःख पचवत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. आता, त्या नक्षलग्रस्त गडचिरोलीत उपशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. हेमलतांची प्रगती व्यवस्थेला आव्हान देणा-या नक्षल्यांना चपराक म्हणून पाहिले जाते आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जुरू परसा हा आदिवासी तरुण पोलिस दलात रूजू झाला. लाहेरी येथे माओवाद्यांशी लढताना 8 ऑक्टोबर 2009 रोजी जुरू परसा याला वीरमरण आले. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच जुरूचे लग्न झाले होते. एम.ए. पर्यंत शिकलेल्या हेमलता गडचिरोली येथे एका शाळेत शिक्षिका होत्या. आयुष्याच्या जोडीदार नक्षवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्यामुळे त्यांच्यावर आभाळच कोसळले होते. परंतु, या विरांगनेने नियतीच्या संकटाचा धाडसाने सामना केला.

हेमलता यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्धार केला. गडचिरोलीमध्ये चांगल्या मार्गदर्शनाची कोणतीही सुविधा नसताना हेमलता यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. गेल्या 10 जानेवारीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्यात हेमलता या उत्तीर्ण झाल्या. त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हेमलता यांचा सत्कार केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हेमलता यांनी परिस्थतीला धैर्याने रामोरे जाण्याचे आव्हान केले. आयुष्यातील दुःखद घटनांना ओलांडून पुढे जाणे शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a comment