मंगल कार्यालयांना पालिकेचा दणका, शहरात एक लाखांहून अधिक दंड वसूली

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. मागील चार दिवसांत जिल्ह्यात सुमारे पावणे सहाशे नवीन कोरोना रूग्ण वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने आता कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. रविवारी शहरातील विविध लग्न समारंभात थेट धडक देत महानगरपालिकेने कार्यवाही केली.

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालयांना महापालिका प्रशासनाने दणका दिला आहे. पडेगाव येथे रविवारी रात्री पथकाने लग्न समारंभात जास्त गर्दी जमवणे, मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवने या नियमांच्या उल्लंघनासाठी दंड ठोठावण्यात आला. लालचंद ब्रम्हकर यांच्या खाजगी लग्न समारंभात दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.

चिकलठाणा येथील दौलत लॉन्सचे प्रदीप शिंदे यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. बीड बायपास रोड वरील वासंती मंगल कार्यालय येथे ५ हजार, रामचंद्र हॉल येथे ५ हजार, हिवाळे लॉन्स येथे ५ हजार, चिकलठाणा येथील लॉन्स चालक फत्ते मोहम्मद यांचे कडून ५ हजार, सिडको येथील केंडे कोचिंग क्लासेस येथे ५ हजार रु, आदर्श अभ्यासिका येथे ५ हजार असे एकूण मिळून ९१,९५० रुपये दंड वसूल करण्यात आला.

शहरात गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस तपासणीसाठी महापालिका प्रशासनाने २० पथके तैनात केली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. काल विविध कोचिंग क्लासेस व लग्न समारंभात जास्त गर्दी, मास्क न लावणाऱ्यावर कार्वाइएचा बडगा उचलण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या