आता विवाह नोंदणी होणार ऑनलाईन

पुणे: विशेष विवाह कायद्यानुसार विवाह करणाऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण नोंदणी पद्धतीने विवाहासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून नोटीस देता येणार आहे. त्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती राज्याचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दस्त विभागाप्रमाणेच विशेष विवाह नोंदणीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केल्याने सोयीच्या ठिकाणाहून संबंधित व्यक्तीला ही सर्व प्रक्रिया करता येणार आहे. पुर्वी वधु-वरांना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा कामासाठी वेळ जात होता.

आता प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून ऑनलाईन केल्याने संबंधित जोडप्यांचा आणि अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. या igrmaharashtra.gov.in संकेतस्थळावर गेल्यास ही सर्व प्रक्रिया करता येणार आहे. राज्यातील स्थावर मिळकतीच्या रेडीरेकनर दरांची माहिती घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. याचीही माहिती igrmhahrashtra.gov.in या संकेतस्थळावरच मिळणार आहे.

संबंधित व्यक्तीला जिल्हा, तालुका, गाव, मिळकत क्रमांक, क्षेत्रफळ यांची माहिती ऑनलाईन भरल्यास सर्व डेटा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात रेडीरेकनरच्या दरांची सर्व माहिती फक्त मुबंई महानगर, उपनगरची उपलब्ध असून राज्यातील इतर जिल्ह्याची माहिती लवकरच ऑनलाईन मिळणार आहे