पुण्यात चर्चा आर. आर. आबांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याची

Marriage of smita r r patil with anand thorat

पुणे: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांचा विवाहसोहळा उद्या पुण्यामध्ये संपन्न होणार आहे. स्मिता या सध्या राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत, तर त्यांचे होणारे पती आनंद थोरात हे पिंपरी चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे हा विवाहसोहळा होणार आहे. पाटील- थोरात विवाहसोहळ्याची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

आर. आर. आबांच्या निधनानंतर राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील कुटुंबाकडे वडीलकीच्या नात्याने विशेष लक्ष दिले आहे, आता पवार यांच्या पुढाकारातूनच पाटील आणि थोरात कुटुंब एकत्र येत आहेत. आनंद थोरात हे दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक माऊली थोरातही आनंद थोरात यांचे सख्खे चुलते आहेत. माऊली थोरात हे भाजप खासदार अमर साबळे यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे हे कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप कार्यकर्ते देखील मेहनत घेत आहेत.

दिवंगत आर.आर.पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी नेते. त्यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या कुटूंबाकडे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे म्हटले होते. आबांना दोन मुली व एक मुलगा आहे. हे सर्व महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी स्वत: या विवाहसोहळ्यात लक्ष घातले आहे.