…तर राष्ट्रवादीचे पणनमंत्र्यांच्या घरासमोर भीक मांगो आंदोलन

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन विनाकारण थांबवून प्रशासक कुंदन भोळे यांनी हुकूमशाहीची पुनरावृत्ती केली. १० सप्टेंबरपूर्वी थकीत वेतन व्याजासह दिल्यास प्रशासकांच्या कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद पाडण्यात येईल. तसेच पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी दिला.

गैरकारभारामुळे सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाला ११ महिन्यांपूर्वी पायउतार व्हावे लागले. बाजार समिती बरखास्त झाल्याने राज्य सरकारने सोलापूरला उपनिबंधकपदी कुंदन भोळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून प्रशासकाने बाजार समितीच्या कारभाराचा जणू बाजार मांडल्याचा आरोप बगले यांनी केला.

सोलापूर बाजार समितीला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. यातून शेतीमाल पुरवठादार शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली रस्ते आणि बांधकामाची कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला गेला. प्रशासकांनी ३९ रुपयांच्या ठेवी स्टेट बँक अॉफ इंडियामध्ये ठेवणे गरजेचे असताना त्यांनी सहकारी बँकेत ठेवल्या. अनधिकृत भूखंड वाटपाच्या चौकशीचा फार्स करून व्यापाऱ्यांना लुटण्याचे काम केले.

बाजार समितीच्या ७३ कर्मचाऱ्यांना पूर्वीच पणन संचालक तथा जिल्हा उपनिबंधकांनी कायमची मान्यता दिली. तरीही प्रशासक कुंदन भोळे यांनी गेल्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे षडयंत्र केले. १२६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थांबवले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरू आहे. प्रशासकांनी मानवी हक्काचे उल्लंघन केले. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे बगले म्हणाले