मारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार

नागपूर : नागपूर शहरातून तान्ह्या पोळ्याला २२ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीत यंदा चीन आणि ब्ल्यु व्हेल गेम चे बडगे काढले जाणार आहेत. आयोजकांनी मिरवणुकीबाबत बोलताना ही माहिती दिली. काळ्या मारबतीला १३४ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३० वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाच वेळी निघतात. तान्ह्या पोळ्याला निघणाऱ्या काळ्या-पिवळ्या मारबतींबरोबर बडग्या-मारबतही लक्षवेधी असतात. तत्कालीन समस्या, अनिष्ट रुढी आणि सामाजिक प्रश्न यांचे वेध घेणारे मारबत आणि बडग्या दरवर्षी काढण्यात येतात. यंदा मृत्यूचा खेळ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’ व भारत-चीन सीमेत घुसखोरी करणा-या चीन विरोधातील बडग्या मिरवणुकीत पहायला मिळणार आहे. जगात एकमेव असलेली ‘मारबत व बडग्या’ मिरवणुकीला आता लोकोत्सवाचे स्वरुप मिळाले आहे. नागपूरचे वेगळे वैशिष्ट अधोरेखित करणारी बडग्या- मारबत मिरवणूक विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाते. प्रतिकात्मक बडगे आणि त्यावर लिहिलेले उपाहासात्मक संदेश मारबत-बडग्या मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यंदा जीवघेणा मोबाईल गेम ब्लू व्हेलचा बडग्या गंजीपेठ येथील बालमित्र बडग्या उत्सव मंडळ काढणार आहे. तर खैरीपूरा येथील युवा शक्ती मंडळ भारतीय सीमेवर घुसखोरी करणा-या चीनविरोधात बडग्या काढणार आहे. काश्मीर दहशतवादी यांसह विविध समस्यांचा वेध घेणार बडगे,लालगंज, मस्कासाथ परिसरातून निघणार आहे.

You might also like
Comments
Loading...