मराठवाड्याची जीवनवाहिनी जायकवाडी धरण ५४ टक्क्यांवर

औरंगाबाद : मागील तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम धरणांच्या साठ्यामध्ये हळूवार वाढ होत असून, आता दारणा आणि नांदूर मध्यमेश्वरमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दरम्यान, असे असले तरीही उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणामध्ये अद्यापही ५५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उपलब्ध आहे. मेंढेगिरी समितीचा अहवाल आणि एमडब्ल्यूआरआरएच्या नियमानुसार ६५ टक्के जायकवाडी धरण भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे अजूनही १० टक्के धरणसाठा वाढीची प्रतीक्षा लागून आहे.

मराठवाड्यासह औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता.

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या धरणात ११६२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा आहे. २१७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची धरणाची एकूण क्षमता आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६०९ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला असून, गेल्या वर्षी ७०१ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.

एमडब्ल्यूआरआरए आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडी ६५ टक्के भरले नाही तर ऊर्ध्व गोदावरीतील धरणांतून खाली पाणी सोडणे बंधनकारक आहे. या नियमाची पूर्ती करण्यासाठी अद्यापही १० टक्के पाणीसाठा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असला तरीही साऱ्यांच्या नजरा जायकवाडीतील पाणीसाठ्याकडे लागून आहे.

दरम्यान, निम्न दुधना ९६ टक्के, येलदरी १०० टक्के, सिद्धेश्वर ९७ टक्के, माजलगाव ९४ टक्के, मांजरा ८४ टक्के, पैनगंगा ९६ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ७२ टक्के, विष्णुपुरी ९२ टक्के हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. सीना कोळेगाव १५ टक्के तर खडका बंधाऱ्यात १०० टक्के आणि शहागड बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या