मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम लढयातील शिलेदार हरपला

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अग्रणी स्वातंत्र्य सैनिक, प्रसिद्ध लेखक आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.दिनकर बोरीकर यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८३ वर्षांचे होते.

प्रा.दिनकर बोरीकर हे गल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,

आज ११ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील स.भु.संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील,असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे. प्रा.बोरीकर यांच्या पश्चात पत्नी सुहासिनी तसेच डॉ.रश्मी बोरीकर, रोहिणी देसाई व डॉ.रेणू चव्हाण या तीन मुली असा परिवार आहे.

प्रा. बोरीकर यांचा जीवनप्रवास

प्रा.दिनकर बोरीकर यांचा जन्म २ सप्टेंबर १९३५ रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.,बीकॉम, एलएलबी पर्यंत झाले होते. विद्यार्थी दशेत असतांना त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. मनमाड, लोणी, वाशीम या भागांत झालेल्या मुक्तिसंग्राम लढ्यात ते अग्रस्थानी होते.

हैदराबाद येथे सेंट्रल सहकारी युनियनमध्ये, सहकार समाचारचे उपसंपादक म्हणून काम. स्वामी रामानंद तीर्थयांच्या आदेशानुसार तेलंगणा, हैदराबाद येथे खादी प्रचार कार्य केले. भाषावार प्रांत रचनेनंतर त्यांनी हैदराबादेतून औरंगाबाद गाठले व सभु संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी संस्थेच्या सरचिटणीसपदाची १९९८ ते २००८ अशी दहा वर्षे धुरा सांभाळली. २००८ ते २०११ या काळात ते सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राहिले तर २०११ पासून आतापर्यंत त्यांनी सभु संस्थचे अध्यक्षपद सांभाळले.

साहित्य लेखन

त्यांनी सातत्याने विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यात बाल एकांकिकांपासून संशोधन,कथा,कादंबरी,वैचारिक,आध्यात्मिक आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. प्रेरणादायी पुस्तके, कविता यांचे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या‘रविवारच्या शोधात’ या बाल एकांकिकेला राज्य शासनाचा २००७-०८चा शाहीर अमर शेख पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांत‘मौलाना आझाद-एक पुनर्मूल्यांकन’,‘महात्मा गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत’,‘सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे विलीनीकरण’,‘पालकत्वाची गुपीते’,‘दी वन मिनीट मॅनेजर’,‘ध्यानदर्शन’ यांचा समावेश आहे.