मराठवाडा ओलाचिंब! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती

buldana rain

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोलीत दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना चांगला फायदा होत आहे. पण सूर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडण्याची भीती आहे. नांदेडमध्ये तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात ओढ दिलेल्या पावसाने दुसऱ्या आठवड्यात जोरदार पुनरागमन केले.

हिंगोलीत सलग तीन दिवस पाऊस
हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय झालेला पाऊस- हिंगोली तालुक्यात ४२.४० मिलिमीटर, कळमनुरी ३७.५८ मिलिमीटर, वसमत ४५.७० मिलिमीटर, औंढा नागनाथ ४१.२० तर सेनगाव तालुक्यात ४५.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणीत नद्या, ओढ्यांना पूर
मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने पालम तालुक्यात पुन्हा एकदा पूर आला आहे. तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्याना धोक्याची पातळी ओलांडून पूर आले आहेत. त्यामुळे १४ गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला असून आठवड्याभरातला हा दुसरा पूर आहे. गोदावरी नदीची पालम तालुक्यातील प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून जवळपास दोन हेक्टर क्षेत्र वरून वाहत आहे. त्याखाली जवळपास ३० ते ३५ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र खालील पिके पाण्याखाली गेली आहेत.

जालन्यात रस्त्यांवर साचले पाणी
जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते, तर सखल भागात पाणी साचल्यामुळे जणू जागोजागी तलावाचे रूप आले होते. मागील आठवडाभरापासून कमी-अधिक सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे शेतात वाफसा नाही. यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. तसेच शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिके पिवळी पडू लागली आहे. जालना शहरातील शनिमंदिर, टाऊन हॉल, पाणीवेस, शिवाजीपुतळा आदी भागात नाल्या तुडुंब भरल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहू लागले.

विष्णुपुरी धरणाचा पुन्हा एक दरवाजा उघडला
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे. मध्येच पावसाचा कमी जास्त जोर वाढत होता. नद्या, नाल्या वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस राहिल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, किनवट तालुक्यातील शनिवार पेठ कोठारी पुलावरून रात्री साडेसातच्या सुमारास पाणी गेल्याने मार्ग बंद झाला होता. किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुखेड, धर्माबाद, अर्धापूर आदी तालुक्यांत जोदार पाऊस झाला. दरम्यान, परभणी जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यामधून ४५२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

उस्मानाबादेत खरीप हंगामातील पिके धोक्यात
उस्मानाबाद जिल्ह्याला रविवारपासून म्हणजे सलग चौथ्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. उस्मानाबादेत मंगळवारी रात्रभर पावसाच्या सरी बरसत होत्या. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला. जुलै महिन्यात साठवण तलाव भरण्याची पहिलीच वेळ आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळात दहा-बारा दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP