बुलेटऐवजी बॅलेटमधून सरकारला उत्तर मिळेल, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नागपूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूरच्या सकल मराठा-कुणबी मूक मोर्चाची सांगता झाली.  मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साद घातली.

“आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका”, असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिलं.

यावर “तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

याशिवाय मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्या, अन्यथा बुलेटऐवजी बॅलेटमधून सरकारला उत्तर मिळेल, असा इशारा आज मराठा तरुणींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिला.

नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली.  त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मॉरिस टी पॉईंटवर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

या मोर्चामध्ये सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला. मराठा मोर्चातील मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.

सरकारकडून चंद्रकांतदाद पाटील, तावडें उपस्थित

दुपारी दोनच्या सुमारास मराठा मोर्चा समारोप ठिकाणी म्हणजेच मॉरिस टी पॉईंटवर पोहोचला. इथे सरकारच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी येऊन निवेदन देणाऱ्या युवतींची भेट घेतली. तसंच त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेले. तिथे युवतींनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.

शिष्टमंडळाला मुख्यमंत्री काय म्हणाले?

मराठा समाजाने मूक मोर्चाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं. नागपुरात शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन, आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.

“आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका”, असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिलं.

यावर “तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

“तसंच कोपर्डी बलात्काराची घटना निंदनीय आहेच.  20 तारखेपासून कोपर्डी बलात्काराची दररोज सुनावणी सुरु होईल. तसंच अट्रॉसिटीचा दुरुपयोग टाळण्यासाठी अभ्यास सुरु आहे. मराठा आरक्षण ही संवैधानिक प्रक्रिया आहे. कोर्टात आम्ही भक्कम बाजू मांडू” असं मुख्यमंत्री म्हणाले.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या मोर्चाद्वारे कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.

सर्वपक्षीय आमदार मराठा मोर्चात

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज मराठा मूक मोर्चा विधानभवनावर धडकणार होता.  त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली होती.