नाशिक येथील मराठी साहित्य संमेलन रद्द नाही! ठाले पाटलांचे स्पष्टीकरण

साहित्य संमेलन

औरंगाबाद : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान आयोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

ठाले पाटील म्हणाले, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी सर्व बाजूने चर्चा केली. नाशिकच्या निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावाकर यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्रातून व नाशिकमधून येणा-या रसिकांच्या आणि संमेलनाध्यक्षांसह भारतभरातून येणा-या निमंत्रित लेखक -कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सध्या तरी हे संमेलन रद्द करण्याऐवजी स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संमेलन रद्द केल्याच्या चर्चा काही माध्यमांतून समोर येत आहेत. त्यावर ठाले पाटील यांनी संमेलन रद्द नव्ह नव्हे तर स्थगित केल्याचे सांगितले. नाशिकमधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा साहित्य संमेलन घेण्याचा विचार करू असे ते म्हणाले.

कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते. पण नोव्हेंबर २०२० च्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला होता. डिसेंबरपर्यंत ती पूर्णपणे आटोक्यात आली आणि महाराष्ट्राने कोरोनावर मात केली असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यानूसार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २६, २७, व २८ मार्च रोजी नाशिक येथे घेण्याचे जाहीर केले होते.

नाशिक येथील संमेलनासाठीची सर्व तयारी झाली होती. अनेकांना निमंत्रणेही पाठवण्यात आली होती. पण, सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आम्ही राज्यातील साहित्य संस्थांशी चर्चा केली. या चर्चेनंतर साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नाशिकमधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा साहित्य संमेलन घेण्याचा विचार करू, असे साहित्य महामंडाळाकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या