मराठी भाषा अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळले नाही- विनोद तावडे

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा विधानसभेत खुलासा

मुंबई, दि. 27: कविवर्य सुरेश भट यांच्या रुपगंधा काव्यसंग्रहाच्या शेवटच्या आवृत्तीत मराठी भाषेच्या अभिमान गीतांची सहा कडवीच प्रकाशित करण्यात आली आहेत. हे अभिमान व गौरवगीत असल्याने कविवर्यांच्या मनात असलेल्या सहा ओळी त्यात गायल्या जातात. त्यामुळे आज विधिमंडळ आवारात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात झालेल्या समूह गायनात सातवं कडवं वगळले नाही,असा खुलासा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधान सभेत निवेदनाद्वारे केला.

यासंदर्भात खुलासा करताना श्री. तावडे म्हणाले, ही मूळ कविता कविवर्य सुरेश भट यांच्या रुपगंधा या काव्यसंग्रहात आहे. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यामध्ये श्री. भट यांनी सहा ओळींची कविता प्रसिद्ध केली. रुपगंधाच्या शेवटच्या आवृत्तीतही सहा कडव्यांचीच कविता प्रसिद्ध झाली आहे.
यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य अजीत पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर श्री. तावडे यांनी सांगितले, राज्यात आठवीपर्यंत मराठी विषय अनिवार्य आहे. अभ्यासक्रम ठरविणाऱ्या अभ्यास मंडळाकडे दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याबाबत विधिमंडळ सदस्यांच्या भावना कळविण्यात येतील.