मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी लागणाऱ्या मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली. त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आझाद मैदानात आंदोलनही छेडले होते.

इतकेच नव्हे तर, मराठा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशा संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद घेत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण सुधारित अध्यादेश जारी करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हंटले होते.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान या अधिवेशनात राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक राज्य सरकारने आज विधानसभेत मांडले. त्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयकला मंजूरी देण्यात आली.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयकला मंजूर देण्यात आल्याने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.