महाराष्ट्रात काल सगळे संक्रांतीत व्यस्त तर हरियानात साजरा झाला मराठा शौर्य दिन

महाराष्ट्रातीलही शेकडो नागरिक उपस्थित

पानिपत : महाराष्ट्राच्या इतिहासात गौरवाचा दिवस म्हणजे १४ जानेवारी १७६१. या तारखेला संक्रांतीच समीकरण वगळता याच दिवशी मराठ्यांनी अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. महाराष्ट्रात काल (रविवारी) सर्व संक्रांतीत व्यस्त असतांना पानिपतमधल्या ऐतिहासिक काला आम युद्धभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हरियाणामधले रोड मराठा आणि महाराष्ट्रातूनही आलेले शेकडो लोक जमा झाले होते. मराठा जागृती मंच हरियाणातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पानिपतच्या युद्धानंतर मराठा सैन्य हे त्याच ठिकाणी स्थाईक झालं. हरियाणामध्ये त्यांची ओळख रोड मराठा अशी आहे पानिपतच्या युद्धासाठी कुरूक्षेत्रावरुन ज्या मार्गाने मराठा फौजा आलेल्या होत्या, त्या मार्गावर कुरुक्षेत्र ते पानिपत अशी बाईक रॅली काढत हरियाणातले शेकडो रोड मराठा युवक या युद्धस्थळावर जमा झाले होते. शहीद स्मारकाशेजारी पणती लावून आपल्या पूर्वजांना नमन करण्यासाठी शेकडो महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या.

haryana bike

जय शिवाजी, जय भवानीचा गजर करत आणि शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा हरियाणवीमधून सादर करत हरियाणामधल्या या रोड मराठा समाजाने आपण स्थायिक जरी दूरवर असलो तरी नाळ मात्र मराठी अस्मितेशी जोडली असल्याचं दाखवून दिलं. या कार्यक्रमासाठी नागपूरच्या भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, जिजाऊंच्या घराण्याचे वंशज बाबाराजे जाधव, इतिहासकार वसंतराव मोरे हेही आवर्जून उपस्थित होते. पानिपतला २५० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हरियाणामधले मराठी अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकाराने या शौर्य दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

You might also like
Comments
Loading...