इंदापुरात मे महिन्यात मराठा समाजाचे अधिवेशन

blank

पुणे : अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन इंदापूर तालुक्यात आयोजित केले असून, ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने 13 व 14 मे रोजी होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंहराजे महाडीक आणि शंभुराजे युवा क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच आयोजित केली होती.या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. हे अधिवेशन इंदापूर येथे होणार असून, त्यामध्ये विविध विषयांवर चर्चाही करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात काम करणा-या घटकांचा तसेच मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचाही उचित सन्मान केला जाणार आहे.

या अधिवेशनासाठी राज्यातील मराठा समाजाच्या 146 आमदारांना निमंत्रण देण्यात येणार असून, याव्यतिरिक्‍त मराठा समाजातील विविध नेते उपस्थित राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. कार्यकारिणीच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायद्यात बदल करावा, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 10 हजार कोटींची तरतूद करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, शेतकर्‍यांना कर्जमुक्‍ती व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करणे, गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे आदी मागण्या मराठा आरक्षण समन्वय समिती आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने केलेल्या आहेत. त्याच्या पाठपुराव्याबाबतची चर्चाही या बैठकीत करण्यात आल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने 200 कोटी रुपयांचा निधी दिला असला तरी अद्यापही कर्जांचे वितरण करण्यात आलेले नाही. तो निधी त्वरित कर्जपुरवठा स्वरूपाने वितरित करण्यात यावा. याशिवाय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर शासनानेच वसतिगृह बांधून द्यावे, अशी मागणीही महाडीक यांनी यावेळी केली.