१९ फेब्रुवारीपासून लढा तीव्र करण्याचा मराठा समाजाचा इशारा

Maratha samaj warns State govt

मुंबई : विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात ५८ हून अधिक मोर्चे काढण्यात आले. तरीही राज्य सरकारकडून मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. याविरोधात मराठा समाजाचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून १९ फेब्रुवारी २०१८ पासून लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय आज येथे एका बैठकीत आला.

कोपर्डी खटल्यातील नराधमांना फाशीची शिक्षा, आरक्षण, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी कायद्यात बदल आदी मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक आहे. यातील कोपर्डी खटल्याचा निकाल वगळता सर्व मागण्या प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज पनवेल येथे रायगड, नवी मुंबईतील नेत्यांच्या वतीने राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. उपरोक्त मागण्यांची पूर्तता न झाल्याने बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालून अधिवेशन न होऊ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच मराठा समाजाची राज्यव्यापी समिती स्थापन करण्यात आली.

सरकारने बंद केलेल्या मराठी शाळा त्वरित सुरु कराव्या याबाबत ठराव पारित करण्यात आला. ११ जानेवारी २०१८ रोजी जळगावात पुढील राज्यव्यापी बैठकीचे नियोजन करण्यात आले.