‘महाराजांची तुलना मोदींसोबत करणं म्हणजे महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखं ‘

blank

टीम महाराष्ट्र देशा : राजधानी दिल्लीत प्रदर्शित करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रदर्शित केल्याची माहिती दिली आहे.

दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक प्रदर्शित करण्यात आले, अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. मात्र, भाजप पक्षाशी संबंधित कोणत्याही ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिलेली नाही.

 

युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.

दरम्यान, या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठे घमासान सुरु झाले आहे. भाजपवर सर्वच पक्ष तोंडसुख घेत असताना ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात रणशिंग फुंकले . हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असं झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या नेत्यांनी दिला आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात मराठा समाजाच्या वतीने हा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींसोबत करणं म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर, महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखं आहे, असं मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना पत्रात सांगितलं आहे.