मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

मुंबई : मराठा समाजातील आमदारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना श्रद्धांजली वाहून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. याशिवाय सोलापूरमध्ये शनिवारी मुंडण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर २५ जुलैला कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या सोशल मीडिया टीमने विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. नवी मुंबई समन्वयकांनी गुरूवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम ठेवल्याचे दिसले.

मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणार

मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारणार जाब ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा