मराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा !

नेवासा : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. राज्यभर हिंसेचा आगडोंब उडाला असताना अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील अनेक आमदार अन पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याचाच भाग म्हणून नेवासा पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांनी आपल्या सभापती अन सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

आपल्या तालुक्याचे नेते आणि मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी “जनतेपेक्षा कोणतेही पद मोठे नाही, प्रसंगी त्यासाठी कोणतेही पद सोडून समाजासाठी उभे राहिले पाहिजे” असा सल्ला दिला आणि त्यानंतर मी समाजाबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे सुनीता गडाख यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणे शक्य असल्याने अशाप्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा गडाख यांनी केली आहे.

यातून सुनिता गडाख यांनी पुन्हा एकदा आपली बांधिलकी सत्तेशी नव्हे तर जनसामान्यांशी असल्याच दाखवून दिल आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य करू नका ; एकनाथ शिंदेंची हर्षवर्धन जाधवांना ताकीद

मागील 3 वर्षांमध्ये भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी – बाळासाहेब थोरात