मुंबई बंद: मराठा आंदोलकांकडून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न, मुलुंडमध्ये टायर जाळले

maratha reservation protesters trying to stop local train in mumbai during protest

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंद पाळण्यात येत आहे, या दरम्यान, आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुलुंड टोल नाक्यावर टायर जाळण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंगापूर येथे झालेल्या मराठा युवकाच्या मृत्युनंतर राज्यभरात आंदोलक आक्रमक झाले आहेत, काल राज्यभरात बंद पाळण्यात आला होता, यावेळी अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर बस पेटवण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. हेच चित्र आज मुंबईमध्ये देखील पहायला मिळत आहे.

मुलुंड टोल नाक्यावर मराठा आंदोलकांनी टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. वरळीत देखील आंदोलकांनी बाईक रॅली काढत दुकाने बंद करण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी काल विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जगन्नाथ सोनावणे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे, औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलन करण्यात येत होते, यावेळी सोनावणे यांनी विष प्राशन केले होते.