मराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने आज आक्रमक स्वरूप घेतले. आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद – नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी एका व्यक्तीने गोदावरी पात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतली होती.त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या :

  •  मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.