ब्रेकिंग : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी विधेयक तयार करत आहेत, असंही ते म्हणाले.

राज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विधानसभेत तर गुरुवारी 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेत मांडणार असल्याचं वृत्त होतं. परंतु आता विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबरला विधेयक मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने अनेक मोर्चेही काढले होते. २०१४मध्ये आघाडी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवला होता.

मागासवर्ग आयोगाने तीन महिन्यात, २ लाखांहून अधिक लोकांचा सर्व्हे केल्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारकडे १५ नोव्हेंबरला सुपूर्द केला. या अहवालात मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. अहवालात करण्यात आलेल्या तीन शिफारसींनुसार मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यता आला आहे.

पुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात