मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद

जालना : साष्टपिंपळगाव इथे २० जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन सरकारला जाग येत नसेल तर आता मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत साष्टपिंपळगाव इथले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच इथल्या आंदोलनकांनी सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलन सुरू केलेय.

राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, या संबंधी अंतिम सुनावणी पाच न्यायाधिशांच्या पीठासमोर झाली. यामध्ये आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे मराठा समाजाची निराशा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. मात्र, तरी देखील त्यांनी आश्वासन पाळले नसल्याचा आरोपही इथल्या आंदोलनकर्त्यांनी केलाय.

मराठा समाजातील मुले शिक्षणापासून आणि रोजगारापासून वंचित राहत आहे. हे सर्व सरकारचे पाप आहे. त्यामुळे आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय कोणताच मार्ग नसल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केलय. पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आंदोलक अधिक आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या