मूक नव्हे आता ठोक मोर्चा,जागरण गोंधळ घालून आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची होणार सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला चांगलंच झापलं असताना आता मराठा संघटना देखील आक्रमक होऊ लागल्या आहेत. लाखोंच्या संख्येने 58 मराठा क्रांती (मूक) मोर्चे अत्यंत शांततेत, शिस्तीत, संयमाने काढून सर्व जगापुढे शांततापूर्ण आंदोलनाचा वस्तुपाठ मराठा समाजाने घालून दिला. मात्र, शासनाने समाजाच्या न्याय्य मागण्यांची कसलीही दखल घेतली नाही. केवळ उपसमितीचा फार्स करून विविध फसव्या घोषणा करून समाजाची दिशाभूल केली, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला चांगलंच झापलं आहे . मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.मराठा आरक्षणाचं काय झालं? आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर करणार? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

आबासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • प्रलंबित प्रश्न सोडवण्याची सरकारकडे इच्छाशक्ती नाही.
  • आरक्षणासह इतर न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी 29 जून रोजी सकाळी 11.30 वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर आई तुळजाभवानीचा जागरण गोंधळ घालून आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात येणार आहे.
  • सरकारबरोबर यापुढे कसलीही चर्चा केली जाणार नाही किंवा निवेदने दिली जाणार नाहीत. शासनाने स्वतः होऊन आपले म्हणणे सादर करावे.
  • कोपर्डी अत्याचार प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. येथेही सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
  • यापुढे गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्यात येईल. मूक मोर्चे नव्हे, तर ठोक मोर्चे काढून शासनाला सळो की पळो करून सोडण्यात येईल.
  • कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील.