मराठा आंदोलकांवरील गुन्हे लवकर मागे घेणार, गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन

maratha reservation protesters trying to stop local train in mumbai during protest

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभर रान पेटवल होत. या आंदोनात काही ठिकाणी हिंसा देखील झाली होती. मराठा समाजाच्या भावना उफाळून झालेल्या उद्रेकामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.

पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. यासंदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत गृहराज्यमंत्री केसरकर यांची एक बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रुपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, स्नेहा गावकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर केसरकर यांनी हे आश्वासन दिले.

आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती. पोलिसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. त्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे.