fbpx

मराठा आरक्षण : ठाण्यात बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ

maratha morcha part 2

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती बंद ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भरपावसात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.