‘भुजबळ, वडेट्टीवारांचा राजीनामा घ्या, मागासवर्गीय आयोग बरखास्त करा’, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारणाने रंग घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि बहुजन विभाग कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणसंबंधी पक्षपाती भूमिका घेत पदाचा भंग केला आहे. त्यांची मराठाविरोधी भूमिका यातून स्पष्ट होते, त्यामुळे या नेत्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आता मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन दिले आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी केंद्राकडे इम्पेरिकल डाटा मागविला होता. केंद्राने हा डाटा न दिल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे मत भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले होते. तर भाजपाकडून हा प्रकार महाआघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी केलेला प्रताप असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे एका विशिष्ट समाजाची भूमिका मांडणारे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मराठाविरोधी असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, विलास देसाई, गणेश काटकर, छायाताई इंदुलकर, प्रवीण पिसाळ आदी समन्वयकांनी बुधवारी राजभवनमध्ये राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच निवेदनही सादर केले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशीही मागणीही केली.

निवेदनात म्हटले आहे की, 15 जून 2021 रोजी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. आयोगावरील नऊ सदस्यांपैकी प्रा. लक्ष्मण हाके, प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. गोविंद काळे, डॉ. नीलिमा सराप हे सदस्य मराठा समाजाबाबत व्देषपूर्ण वक्तव्य, भाषण विविध माध्यमांव्दारे करत असतात. 28 जून 2021 रोजी लोणावळा येथे ओबीसी समाजाच्या चिंतन शिबिराला राज्य मंत्रिमंडळात मंत्री असणारे विजय वड्डेटीवार, आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके उपस्थित होते. शिबिरातील भाषणात प्रा. हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शविला. तसेच तसा ठरावही मंजूर करण्यात आला.

मागासवर्गीय आयोग बरखास्त करण्यात यावा
यासोबतच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारने नेमलेला मागासवर्गीय आयोग हा पक्षपाती असून यातील बहुतांश सदस्य पक्षपाती असून हा आयोग बरखास्त करण्यात यावा. तसेच या आयोगात एकही मराठा सदस्य नसल्याने या आयोगाच्या कारभारावर पक्षपात होण्याची बाजू मराठा क्रांती मोर्चाने मांडली आहे. त्यामुळे सरकारने नव्याने निःपक्षपाती असलेला आयोग स्थापन करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP