मराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलना दरम्यान पोलिसांवर जमाव चालून आल्याने पळताना पोलीस कॉन्स्टेबलचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लक्ष्मण पाटगावकर असं पोलीस कॉन्स्टेबलांचं नाव आहे. औरंगाबादमध्ये त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. या दरम्यान पळत असताना आणखी एक पोलीस खाली पडल्याने जखमी झाले आहेत.

दरम्यान,मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत यासंदर्भात कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलावून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात असं देखील आवाहन त्यांनी केलं आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

 

वारकऱ्यांची असुविधा टाळण्यासाठी या शहरांत आजचा बंद नाही

धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण