मराठा समाज आक्रमक ! आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’

maratha-morcha-2

तुळजापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. असे आश्वासन दिले होते. मात्र सरकाराने गेल्या १० महिन्यात आरक्षणासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. आज दुपारी तुळजापुर येथे झालेल्या बैठकीत मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत देण्यात आले.

तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक आज (बुधवारी)घेण्यात आली़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’ पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे. २९ जून रोजी तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनास प्रारंभ होणार आहे.

काय असतील मराठा समाजाच्या मागण्या ?

– मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी़
– शैक्षणिक सवलतींचा जी़आऱ काढावा़
– शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे़
– अॅॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात़