fbpx

मराठा, जाट, पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करु नये – हरिभाऊ राठोड

Maratha samaj warns State govt

ठाणे : मराठा- जाट आणि पटेलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर ओबीसी आरक्षणामध्ये या तीन समाजाचा समावेश केल्यास सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेचे नेते आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, देशात ओबीसींची जनगणना झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही राठोड यांनी केली असून त्यासाठी येत्या २७-२८ जानेवारी रोजी शिर्डी येथे ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला देशभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. इंग्रज राजवटीमध्ये १९३१ ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात आली होती.

त्यानंतर योग्य अशी जनगणना झालेली नसल्यामुळे संख्येनुसार ओबीसींना आरक्षण मिळत नाही. आता केंद्र सरकारने ओबीसींचे विभाजन करुन न्या. रोहिणी आयोग नियुक्त केला आहे. मात्र, ओबीसींची संख्या माहिती नसतानाही त्यांचे विभाजन करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी साईसेवा सदन शिर्डी येथे विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी, अतिमागास आदी जातीप्रवर्गाची देशव्यापडी ओबीसी परिषद आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेला देशभरातील आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत, असेही राठोड यांनी सांगितले. दरम्यान, मराठा- जाट आणि पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले की, या समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.

मात्र, त्यांना ओबीसींमध्ये आरक्षण देऊन आमच्यावर अन्याय करु नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणातही राज्या-राज्यामध्ये काटछाट करण्यात आली असून यापुढे सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी राठोड यांनी केली.