कोरेगाव भीमा हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात! : रामदास आठवले

मुंबई : कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात असण्याची शक्यता केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीच्या बेधडक या कार्यक्रमात ते बोलत होते.

रामदास आठवलेंनी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात असल्याची शंका उपस्थित केलीय. तसंच जर समजा या दंगलीमागे संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशीही भूमिका मांडलीय. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्याचं आठवले यांनी सांगितले आहे.

भाजपच्या राज्यात दलितांवर अत्याचार होत नसल्याचा दावा करत 2019 सालच्या निवडणुकीतही आपण मोदींसोबतच राहू, अशीही माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चांगलं काम करत असल्याचं प्रमाणपत्र आठवलेंनी यावेळी देऊन टाकलं. यासोबतच जिग्नेश मेवाणी हे फक्त गुजरातचे दलित नेते असून त्यांच्यापासून आपल्याला कोणताही राजकीय धोका वाटत नाही, असंही आठवलेंनी यावेळी स्पष्ट केलंय.