fbpx

गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटातील जहाल नक्षली नर्मदाक्काला पतीसह अटक

मुंबई : नक्षलवादविरोधात पोलिसांना मोठे यश मिळले आहे. जहाल नक्षलवादी अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ नर्मदाक्का आणि तिचा पती किरण कुमार उर्फ किरण दादा यांना पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केले आहे. किरण कुमार आणि नर्मदाक्का या दोघांवरही प्रत्येकी २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

माहितीनुसार , नर्मदाक्का आपल्या आजारी पतीसह हैदराबाद येथील रुग्णालयात असताना तेलंगणा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नर्मदा ही कृष्णा जिल्हय़ातील गुडिवाडा येथील रहिवासी आहे. २०१२ रोजी तिला दक्षिण गडचिरोलीच्या नक्षल कारवायांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कार्यक्षेत्रात वाढ केली गेली. आदिवासी आणि जनजातीय क्षेत्र-दंडकारण्यातील महिलांना नक्षल चळवळीत दाखल करुन घेण्यात तिचा मोठा वाटा आहे.

आंध्र प्रदेशचा प्रमुख नक्षलवादी किरण कुमार ऊर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा अगदी सुरुवातीपासून नक्षल चळवळीत सक्रिय होते. किरण कुमार हा दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा सदस्य (डीकेएसझेडसी) असून गडचिरोली जिल्हय़ाचा प्रभारी होता. छत्तीसगड राज्यात या दोघांची दहशत होती. किरण कुमार हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. नक्षलवाद्यांच्या (डीकेएसझेडसी) राजकीय अंग असलेल्या ‘प्रभात’ पत्रिकेचा तो संपादक होता. तांत्रिकदृष्टय़ा तो अतिशय सक्षम आहे.