‘राज्यातील अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात, लवकरच होणार पक्षात दाखल’

टीम महाराष्ट्र देशा : अखेर विधानसभेचे बिगुल वाजले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच विधानसभेचे फटाके वाजणार आहेत. आता सगळे पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले असून कॉंग्रेस पक्ष आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विवीध पक्ष कामाला लागले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी कॉग्रेस निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीत आर्थिक मंदी, बेरोजगारी सह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातचं ते नेतेही कॉंग्रेसमध्ये दाखल होणार आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.कॉंग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर करणार आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी आम्ही लढायला तयार असे म्हणणारी शिवसेना बॅकफुटला जाताना दिसते आहे. हे लक्षण चांगल नाही, असा टोलाही थोरातांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान कॉंग्रेस पक्ष या निवडणुकीला आघाडी करून सामोरा जाणार आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये 125 – 125 मित्रपक्षांना 38 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे लवकरच जागा वाटपही होणार. मात्र भाजप सेना युतीच घोंगड अजून भिजत पडल आहे. दोन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार नसल्याच दिसत आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.