भाजपात प्रवेशासाठी अजून खूप लोक रांगेत; वेळ आल्यावर कळेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा!

devendra fadanvis

मुंबई: भाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजून खूप लोक रांगेत आहेत, समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिलाय. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, पण वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असं देवेंद्र फडणवीस उपस्थित पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत.

निरंजन डावखरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मात्र यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते. त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना नरेंद्र पाटील यांनी दिली.