वाडा तालुक्यातील अनेक जंगले उद्ध्वस्त; पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट

पालघर   : वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र, काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे.

यामुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच त्याच बरोबर अनेक वन्यजीव, प्राणी या वणव्यांमधे मृत्यू पावतात. दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होतात. या वणव्यांमुळे पाळीव जनावरांच्या चरण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो. दर वर्षी लागणा-या याआगींमुळे जंगलातील औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहेत. शासनाच्या कोटींच्या कोटी वृक्ष लागवाडीच्या संकल्पाला आणि स्वप्नांना या वणव्यांमुळे तडा जात असून वनविभाग मात्र त्यावर उपाय करण्यास असमर्थ ठरलेला आहे. अनेक भागातील जंगलांमधे काही समाजकंटकांकडून ससे, रान डुकरे, मोर आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलाना आग लावली जाते.अशा समाजकंटकांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा दर वर्षाचा कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीवरील सगळा खर्च हा अशा वणव्यांमुळे वाया जाईल असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.

दर वर्षीच्या वणव्यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर वर्षी रानोमाळी-डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगीने वेढलेले आपण बघतो. मात्र यावर उपाय शोधण्यास वन विभागाला आजपर्यंत यश आलेले नाही. शासन वृक्षारोपणासाठी करोडो रु पये खर्च करते मात्र जंगलातील अशा वणव्यांमुळे जंगलांतील वन्यजीव आणि वनस्पती नष्ट होतात.यावर वनविभागाने उपाय शोधण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया निसर्ग प्रेमी विक्रांत पाटील यांनी दिली.