हुतात्मा स्मारकाच्या जागेवर अनेकांचा डोळा

सातारा : देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी ज्या लोकांना आपल्या घरादारांवर नांगर फिरवला त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी प्रत्येक तालुक्यासहीत जिल्ह्यातील हुताम्यांचे स्मरण व्हावे यासाठी हुतात्मा स्मारकाची उभारणी केली.

सातारा तालुक्यात 1912 पासून ते 1957 या कालखंडात स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती देवून हौतात्म पत्करले. त्या 19 व अज्ञात हुतात्म्यांचे स्मरण रहावे म्हणून सातारा शहरातील करंजे गावच्या हद्दीत हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. ही जागा मोक्याची असून या जागेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सातारा नगरपरिषद काम पाहत आहे. परंतू या जागेवर अनेकांचा डोळा असल्याने या जागेचा वापर फक्त सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांनी करावा, अशी मागणी पुढे येवू लागली आहे.

सातारा बसस्थानका समोरच सिटी सर्व्हे नं. 278/ब/1 याठिकाणी हुतात्मा स्मारकासाठी राज्य शासनाने ही जागा आरक्षित करुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी याठिकाणी नेताजी बोस स्मारक समिती सातारा यांनी नेताजींच्या पुतळ्याची उभारणी केली.

त्यानंतर 23 जानेवारी 1991 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय दिनी याठिकाणी अनेकजण भेटी देवून देशप्रेमाबद्दल नतमस्तक होतात. सध्या नगरपालिकेने याठिकाणी उद्यान उभारले आहे. पण उद्यानाऐवजी या जागेवर अतिक्रमण केलेल्या टपर्‍या, हातगाड्या टाकून देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी अनेक दुष्कर्म याठिकाणी चालू असतात. तसेच सहा वर्षापूर्वी सातारा नगरपरिषदेने अग्नीसुरक्षा अभियानांतर्गत अग्निशमन केंद्राची उभारणी करुन या स्मारकाची जागा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीसाठी याचठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले असून भविष्यात याचठिकाणी हुतात्म्यांऐवजी धार्मिक कार्यासाठी या जागेचा वापर होईल, अशी भीती श्रीमती हर्षदा शेडगे यांनी व्यक्त करुन नगरपरिषद व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे.

कारण 1976 साली आयटीआय, त्यानंतर 1981 साली हुतात्मा स्मारक व 2000 साली दहा गुंठे जागा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक यांना देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही जागा विविध कारणांनी वादग्रस्त ठरु लागली आहे.

सध्या सातार्‍यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळे तयार करण्यात येत आहे. सातारा शहरानजिक माजगांवकर माळ, जिल्हा परिषद मैदान, कोटेश्‍वर मैदान, मोळाचा ओढा, जिल्हाधिकारी परिसरात मोकळी जागा असूनही त्याठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तळे केल्यास भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परंतू या जागेऐवजी ज्या हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडले, त्यांचे स्मरण जतन करण्याऐवजी इतर कामासाठी या जागेचा वापर होत आहे. ही खेदाची बाब आहे.

स्वातंत्र्यसैनिक हे देशासाठी लढले आहेत. त्यांच्या वारसदारांनाही त्याचा सार्थ अभिमान आहे. तसेच गणरायाला कोणताही विरोध नाही. पण गणेश मूर्ती विसर्जनाच्या माध्यमातून मंडळातील येणारी तरुणाई ही या पवित्र स्मारकाची नासधूस करु शकते. तसेच याच्या पावित्र्याला धोका निर्माण होवू शकतो. सध्या या परिसरात गटार झाकण, बेकायदेशीर टपर्‍या, हातगाडे विखुरलेल्या अवस्थेत आहेत. स्मारकासमोरील दरवाजा चोवीस तास बंद असतो. परंतू नगरपालिकेच्या अग्नीशमन केंद्रानजिकचा दरवाजा उघडा असतो. याचा अनेकजण गैरफायदा घेतात, अशी खंत श्रीमती हर्षदा शेडगे यांनी व्यक्त केली आहे. सध्या या हुतात्मा स्मारकाच्या जागेबाबत फारुख पटनी, कृष्णात शेवते, आयेशा पटनी व स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत.