भाजपचे अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात

नंदुरबार : भाजपचा राज्यातील प्रभाव कमी होत असल्याने अन्य पक्षांतून भाजपत जाऊन चूक केल्याची भावना अनेक नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे भाजपचे अनेक नेते कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. माजी महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कॉंग्रेसमध्ये आल्यास स्वागत असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यावर आ. चव्हाण बोलत होते.

मात्र खडसेंच्या ऑफरबद्दल पक्षश्रेष्ठींनाच विचारा असेही आ. चव्हाण म्हणाले. मागील साडे तीन वर्षांत सरकारने संस्थाने मोडायचे काम सुरू केले आहे. देशभरात अल्पसंख्य व दलितांवर अत्याचार सुरू आहेत. लोकांच्या सरकारवरील आशा फोल झाल्या आहेत. संविधान टिकते की नाही व पुढील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात की नाही, याची भीती असल्यानेच विरोधी पक्षांना एकत्र येऊन संविधान बचावचा नारा देण्याची वेळ आली, असेही आ. चव्हाण म्हणाले.