राज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव

टीम महाराष्ट्र देशा- ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेल्या मराठी चित्रपट ‘मंत्र’ ने यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आपला ठसा उमटविला. राज्य पुरस्कारामध्ये सामाजिक विषय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निर्माता संजय काटकर, दिग्दर्शक हर्षवर्धन आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून शुभंकर एकबोटे यांना पुरस्कार देण्यात आले.

‘माणूस फक्त पैशासाठी काम करत नाही, तर त्या कामात तो समाधान शोधतो’ हे चित्रपटातील वाक्य ‘मंत्र’ च्या निर्माते आणि दिग्दर्शकांना तंतोतंत लागू पडते. आय.टी क्षेत्रात काम करत असतानाच चित्रपटाची निर्माण प्रक्रियाही त्यांना आकर्षित करत होती. त्यामुळेच दोनेक वर्षात या क्षेत्रात लागणाऱ्या तांत्रिक बाजूंचे कौशल्य अवगत करून वेदार्थ क्रिएशन्सच्या देवेंद्र शिंदे, रजनीश कलावंत, सचिन पंडित यांनी संगीतकार विश्वजित जोशी यांच्या बरोबर ‘मंत्र’ ची योजना करून ती ड्रीमबुक प्रोडक्शन्सच्या संजय काटकर यांच्यापुढे मांडली. विषयाचं वेगळेपण भावल्यान त्यांनीही या चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच मार्केटींग आणि सादरीकरणाची जबाबदारी घेतली.

निर्माते, दिग्दर्शक यांच्या बरोबरच मुख्य भूमिका करणारा सौरभ गोगटे या सर्व IT मधील लोकांचा ‘मंत्र’ हा पहिलाच चित्रपट, पण पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संस्कृती कलादर्पण मागोमाग महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातही जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरला हे या टीमच्या प्रयत्नांचे यश आहे. याच महिन्यात जर्मनीमध्ये होणाऱ्या मराठी चित्रपट उत्सवासाठीही ‘मंत्र’ ची निवड केली आहे.

देव आणि धर्म या विषयावर भाष्य करणं हे आजच्या काळात खूपच धाडसाचे काम आहे. पण हा अत्यंत संवेदनशील विषय ‘मंत्र’ या चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्र’ची कथा घडते. प्रेक्षकांना, समीक्षकांना आणि वेगवेगळ्या महोत्सवातील तज्ज्ञ परीक्षकानांही चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि लेखकान मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांनी प्रभावित केले आहे. खर तर लेखानाप्रमाणेच या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयालाही सर्वत्र दाद मिळते आहे. पदमश्री मनोज जोशी, दीप्ती देवी, पुष्कराज चीरपुटकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर यांच्या बरोबरच अनेक नव्या चेहर्यांनी कमाल केली आहे. सनी आंबवणे हे पात्र रंगवणारा शुभंकर एकबोटे हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा. त्याचा अभिनय आईसारखाच नैसर्गिक वाटतो. एकंदर या IT मधल्या तज्ज्ञ लोकांकडून भावी काळातही चांगला content तयार होण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.