ईडीची भीती दाखवून भाजपने विखे पाटलांना पक्षात घेतले : मनसे

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व प्रकरणावरून मनसेने आता भाजपवर आरोप करायला सुरुवात केली आहे.

मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी राज ठाकरे हे ईडी बिडीला घाबरणारे नाहीत असं विधान करताना मोदी सरकारवर तोफ डागली. याविषयी बोलताना त्यांनी सत्तेत आल्यानंतर मोदी आणि अमित शहा यांनी आरबीआय, सीबीआय, इडी सारखे विभाग आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला. तसेच आमच्यासमोर विरोधक टिकलाचं नाही पाहिजे यासाठी मोदी आणि शाह हे अशा प्रकारचे छापे घडवून आणत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

तसेच पुढे बोलताना, जे सक्षम विरोधक आहेत त्यांना अशा प्रकारची भीती दाखवून पक्षात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाटील म्हणाल्या. यात लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. तसेच विखे पाटील यांच्यासह इतरही अनेक नेत्यांना अशाचं प्रकारे धमकावले असल्याचंही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी भाजपकडून राज ठाकरेंवर अशा पद्धतीची गळचेपी करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध करेल असा इशाराही पाटील यांनी भाजपला दिला आहे. तसेच राज ठाकरेंवर दबाव टाकणे हे इव्हीएममध्ये फेरफार करून निवडून येण्याइतके सोप्पं नसल्याचाही पाटील यांनी सांगितले.