मनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर

Abhay Agarkar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. मनोज कोतकर यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतरही भाजपचे काही नेते मात्र कोतकर भाजपमध्येच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता भाजपनेच कोतकर यांना आपण कोणत्या पक्षात आहात, याची विचारणा केली आहे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत भाजपचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ॲड.अभय आगरकर यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

अचानक भारतीय जनता पार्टीची साथ सोडून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे जाहीर करावे, अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे. सत्तेपेक्षा प्रतिमा जपण्यास भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोतकर यांनी वेळीच वस्तुस्थिती समोर मांडून स्वतः वरील कारवाई टाळावी. त्यांना महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल, तर त्यांनी ती खुशाल करावी. मात्र पक्षाने त्यांच्यावर पक्षशिस्त भंग व पक्षांतर यावरून कारवाई सुरू करावी, अशी मागणी ॲड.अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने सभापती पद मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला यश न आल्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली असून, कोतकर यांनी आपण कोणत्या पक्षात आहात हे सांगावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-