fbpx

लवकरच बरा होऊन गोव्यात परतेल; मनोहर पर्रिकरांनी दिला व्हिडिओ संदेश

नवी दिल्ली – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर सध्या अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते अमेरिकेला रवाना झाले होते. तत्पूर्वी त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

पर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्याच्या मंत्रीमंडळातील तीन कॅबिनेट मंत्र्यांची सल्लागार समिती गोवा सरकारचा कारभार चालवीत आहे. या समितीमध्ये सुदीन ढवळीकर (एमजीपी), फ्रान्सिस डिसुझा (भाजपा) आणि विजय सरदेसाई (जीएफपी) या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

दरम्यान अमेरिकेत स्वादुपिंडाच्या संबंधी आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर येत्या काही आठवड्यात भारतात परतणार आहेत. रविवारी एक व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी स्वतः ही माहिती दिली. गोव्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पर्रिकर यांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला.

गोव्याला नवा मुख्यमंत्री द्या अन्यथा असंवैधानिक पद्धतीने स्थापण करण्यात आलेले गोव्याचे पर्रिकर सरकार बरखास्त करा, अशी मागणी विरोधीपक्ष काँग्रेसने शनिवारी अमित शहा यांच्याकडे केली होती. या प्रकरणी काँग्रेसचे गोव्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांच्या स्मारकाजवळ निदर्शने केली. यावेळी त्यांनी गोव्याला पुर्णवेळ मुख्यमंत्री देण्याची मागणी केली.