एक असाही मुख्यमंत्री ! जो रुग्णालयातूनच करत आहे अर्थसंकल्पावर काम

टीम महाराष्ट्र देशा: स्वादुपिंडाला सूज आल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच गोवा विधानसभेत गुरुवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे. गोव्याच्या अर्थखात्याची धुरा अद्याप पर्रिकरांकडेच आहे, त्यामुळे आता ते रुग्णालयातूनच अर्थसंकल्पावर अखेरचा हात फिरवत आहेत अशी माहिती विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

‘विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भातील फायली तपासण्याची परवानगी मला देण्यात आलेली आहे. मात्र, पर्रिकर बुधवारी गोव्यात परतल्यास तेच अर्थसंकल्प सादर करतील,’ असं ढवळीकर यांनी सांगितलं आहे. ढवळीकर हे गोवा सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री असून भाजपचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आहेत.

दरम्यान, मनोहर पर्रीकर याचं अर्थसंकल्पीय भाषण तयार आहे, केवळ प्रस्तावना बाकी आहे. अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ते सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती आहे.