मनोहरे ‘स्मार्ट’ सीईओ पदी अखेर रुजू , कामकाजास केली सुरुवात

औरंगाबाद : नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या तातडीच्या सूचनांनुसार ते गुरुवारी (दि.१८) औरंगाबादेत दाखल झाले. आज सोमवारी (दि.२२) त्यांनी स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारला असून कामकाजास सुरुवात केली आहे. स्मार्ट सिटीच्या नवीन ईमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करत त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला.

प्रचंड राजकीय विरोधानंतर आज या राजकीय नाट्यावर पडदा पडला असला तरीही येत्या काळात ते कशा पद्धतीने काम करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. आत्तापर्यंतच्या प्रत्येक आयुक्तांनी स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेच्या कामांना झुकते माप दिले. महापालिकेच्या आर्थिक अडचणीमुळे जी कामे होऊ शकली नाहीत. ती कामे स्मार्ट सिटी योजनेत घेण्यात आली. महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली होती. मात्र गुरुवारी (दि.१८) आठ दिवसानंतर मनोहरे औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांनी शासन आदेशानुसार आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजू होत असल्याचे पत्र महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानुसार आज ते रुजू झाले आहेत.

राजकीय विरोध कायम : औरंगाबाद स्मार्ट सिटीस आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा अशी मागणी करत मनोहरेंची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याची तोफ खैरेंनी डागली आहे. यासोबतच माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचाही त्यांना विरोध आहे. दुसरीकडे मनोहरे यांनी मात्र पदभार स्वीकारला असून या पार्श्वभूमीवर ते कसे काम करता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या